
१) हरिश्चंद्रगडावरील गणेशगुफा
भटक्यांची पंढरी असणाऱ्या, हरिश्चंद्रगडावरील गुहेतील भव्य गणेश लंबोदर.तारामती शिखराच्या पोटात कोरलेल्या गणेशगुफा याच बाप्पाच्या नावाने ओळखल्या जातात. सुमारे ६ फुट उंचीचा हा लंबोदर जेव्हा पाहतो, तेव्हा गड चढून आल्यावर आलेला थकवा पूर्णतः नाहीसा होतो. या आडरानात या गुहेत कधी कोणी कोरला आहे कोणास ठाऊक. पण कित्येक भटक्या ट्रेकर्सना रात्रीच्या मुक्कामी या गणरायची साथ आणि आशीर्वाद असतो.

२) रतनगडावरील गणपती
नाशिक जिल्ह्यात प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला किल्ला रतनगड आणि त्या गडावरील गणपती शिडीच्या मार्गे आपण वर आल्यावर आपल्याला पहिले द्वार लागते, त्यावरच एक बाप्पाची सुंदर अशी मूर्ती कोरलेली आहे. तेथून पुढे आले की उजव्याबाजूला एक रस्ता गुहेपाशी जातो, तर दुसरा दाव्याबाजूचा रस्ता आपल्याला दुसऱ्या दारापाशी नेतो. गडाच्या हनुमान दरवाज्यामध्ये उजव्या हाताला हे देखणं गणेशशिल्प आहे. बाजूला रिद्धी सिद्धी आहेत असे सर्वजनांचे म्हणणे आहे, पण माझ्यामते ते गणेश सेवक असावेत.

३) रामगडावरील तांत्रिक गणेश
कणकवलीपासून कणकवली-आचरे मार्गावर रामगड म्हणून एक गाव आहे. गावचे नाव हे रामगड या गडाच्या नावामुळेच पडले. १५-२९ मिनिटात आपण गडाच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहचतो. गडावर असणाऱ्या एका वाड्यात आपल्याला एक वेगळीच गणेशाची मूर्ती पाहायला मिळते.
मूर्तीला नीट निरखून पाहिले तर, पायच्या खाली ७ कवट्या कोरल्या असून गळ्यात ही कवट्यांची माळ आपल्याला दिसून येईल. एका लेखात वाचले होते की गडावरील ही मूर्ती तंत्रमार्गीयांची असून तिच्या गळ्यातील नरमुंडमाळा व असनाखाली असलेली नरमुंडीची बैठक हे सिद्ध करते. खरे तर कोकणातील लोक बाप्पाला खूप मानतात, पण गडावरच अश्या प्रकारची मूर्ती आहे, याची गावकऱ्यांना त्याबद्दलची फारशी माहिती नाही.

४) कोरिगडावरील बाप्पा
गावातून वर गडावर जातांना पायवाट संपल्यावर पायर्या लागतात. थोड्या पायर्या चढून वर आल्यावर उजव्या बाजूला दोन खांबांवर तोललेली एक गुहा आहे, अन याच गुहेच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे.बाप्पाची ही मूर्ती चर्तुभुज असून मागील हातात आयुधे धारण केले आहेत. बाप्पाची सोंड ही डाव्याबाजूला मोदकावर वळलेली असून उजवा हात हा आशीर्वाद देण्यासाठी स्थिरावला आहे.

५) त्रिंबकगड-ब्रम्हगिरी-दुर्गभंडार-दुर्गशिल्पांचा खजिना
सह्याद्रीचे राकट कड्यांचे सौंदर्य प्रत्येकालाच आवडते. त्यात नाशिक परिसर म्हणजे अनेक दुर्गशिल्पांचा खजिनाच. त्याच जिल्ह्यात असलेला त्र्यंबकगड किंवा ब्रम्हगिरी, आणि दुर्गभंडार असे गडकोट. सुरवात ही अगदी सौम्य आणि मध्यम चढावाचे टप्पे बाजूला खेटून उभे असे ताशीव कातळकडे, अन त्याच ताशीव कड्याच्या पोटातून खोदलेली कुठेतरी अनेकविविध दुर्गशिल्पांचा अमाप खजिना, आश्चर्य वाटावं अशा अनेक गोष्टी, येथे मिळतात. त्र्यंबकेश्वर चे दर्शन घेऊन आपण गडाकडे जात असताना, पायऱ्या सुरू होतानाच आपल्याला गणपतीची लेप लावलेली सुंदर मूर्ती दिसते, थोडे पुढे चालून वर आल्यावर उजव्या हाताला एक धर्मशाळा आहे, अन त्याच्याच द्वारावर कोरलेली एक गणेशमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच भग्न झालेली एक गणेश मूर्ती ही आपल्याला गडावर आल्यावर दिसून येते.

६) दातेगड शुपकर्ण मूर्ती
दातेगड म्हणजेच सुंदरगड आणि याच सुंदरगडावर आहे गणेशाची सुंदर शुपकर्ण मूर्ती दातेगड पाहून शिवरायांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे सुंदर हा शब्द बाहेर पडला होता. म्हणून यास सुंदरगड असे नाव पडले. पाटणहून पुढं कोयनानगर, चिपळूणला रस्ता जातो, पण गडाकडं जाणारा मार्ग मात्र पाटणमधूनच आहे. दातेगड हा चार गोष्टींसाठी खूप आवर्जून पहावा असा आहे. पहिले म्हणजे गडावरील तलवार विहीर, दुसरे म्हणजे विहिरीतून खाली उतरल्यावर वर पाहिले की ती तलवारीच्या आकारासारखीच दिसते. तिसरे म्हणजे हनुमान मूर्ती अन चौथे म्हणजे गडावरील शुपकर्ण अशी गणेश मूर्ती.
या मूर्तींच वैशिष्ट्यं असं, की सूर्योदय होताना सूर्यकिरणं गणेशमूर्तीवर पडतात. सायंकाळी सूर्यास्तावेळी ती मारुतीच्या मूर्तीवर येतात.
एकदा निवांत वेळ घेऊन दातेगडाला भेट जरूर द्या.

७) हडसरवरील गणेशमूर्ती
हडसर जुन्नरपासून १२ किलोमीटरवर आहे. हडसर हा ओळखला जातो तो त्यावरील कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग, कातळात खोदून काढलेली दोन अत्यंत रेखीव प्रवेशद्वारं, त्यावरच्या कमानी, बुरुज, पहारेकऱ्यांच्या खोल्या इत्यादींसाठी.
गडमाथ्यावर पोहचल्यावर आपण तळ्याच्या पुढे काही अंतरावर गेल्यावर महादेवाचं एक मंदिर आहे. या मंदिरात आपल्याला एका बाजूला गणेशाची अतिशय रेखीव मूर्ती दिसते. ती आजही ही मूर्ती अतिशय सुस्थितीत असून चतुर्भुज आहे. मागील दोन हातांत शस्त्रे आहेत तसेच डोक्यावर नागाचे शिल्पही दिसते. आवर्जून पहावी अशी ही गणेशाची मूर्ती.

८) अवचितगडावरील गडगणेश
गडाच्या दक्षिण बुरुजाकडे जाताना आपल्याला एक छोट्या चढणीवर पत्र्याच्या शेड मध्ये असणारे शिवमंदिर आहे. त्यात प्रवेश करतानाच त्याच्या डाव्याबाजूला गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे. तसेच गडावर जाण्यासाठी एकूण ३ मार्ग त्यातीलच पिंगळसाई मार्गे आपण गडावर जातानाच गावात अतिशय देखण आणि कलाकुसरीने नटलेलं एक पेशवेकालीन मंदिर आहे. मंदिराची बांधणी ही संपूर्ण दगडात कोरलेली असून गाभाऱ्यातील बाप्पाची मूर्ती खूपच विलोभनीय आहे.

९) वासोटा अरण्यगणेश
काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील कोयना नदीच्या खोऱ्यात रानात वसलेला दुर्ग म्हणजे किल्ले वासोटा. वन्यक्षेत्रात बोटीने उतरुन १५ मि. चालले की डाव्या बाजूला पडझड झालेल्या मंदिरात गणपतीची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती आहे.
त्या ठिकाणी गेल्यावर आजूबाजूला पक्ष्यांचा गाण्याचा आवाज आणि त्यातच डोंगरधारेतून वाहत येणार पाणी आणि त्याचा खळखळाट अश्या या शांत प्रसान्नि वातावरणा मध्ये असणारे हे अरण्यगणेश मंदिर आपले पाय तेथून हलूनच देत नाही. बाप्पा जरी गडावर नसला तरी गडावर जाणाऱ्या मुख्य मार्गावरच तो प्रथम दर्शन आपल्याला देतो.

१०) गडांचा गड राजगड वरील गणेशमूर्ती
राजगडावर मुख्य तीन माच्या आहेत, त्यातीलच सुवेळामाचीवर आहे तटगणेश माचीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहचल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतून भुयारी चिलखती परकोटाची रचना दिसते. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एका खडकात ३ ते ४ मीटर व्यासाचे नेढ आहे. हेच आपण दुसऱ्या टप्प्यात जाऊन पाहिले की ते हत्तीच्या अंगावर अंबारी ठेवल्यासारखे वाटते, म्हणून त्याला हत्तीप्रस्तर म्हणतात. त्याच्याच अलीकडच्या तटात तटगणेश कोरला गेला आहे. अन तेथूनच खाली जाण्यासाठी एक गुप्त दरवाजा आहे.

११) प्रबळमाची गणेशमूर्ती
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि जवळ असणारे दोन भव्य गडकोट म्हणजे कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ठाकूरवाडी गावातून आपण प्रबळमाचीकडे प्रस्थान करतो. माची येण्याच्या आधीच आपल्याला एक द्वार लागते. त्या द्वाराच्या आजूबाजूला आपल्याला तटबंदीचे अवशेष ही दिसतील. त्याच्याच उजव्या बाजूला कातळात हनुमान आणि गणेशाच्या कोरीव मूर्ती पाहायला मिळतात.