महाराष्ट्र ही इतिहासाची जन्मभूमी. प्रभू रामचंद्रांपासून शिवप्रभूंपर्यंत अनेक शूरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी.त्यांच्या तेजस्वी दर्शनमात्रे बहरलेल्या अनेक कथा दंतकथा महाराष्ट्राचा कणा समजल्या जाणाऱ्या सह्याद्रीतच नव्हे तर या इथल्या मातीच्या कणाकणात भिनलेल्या आहेत. इथल्या बालकांच्या बाळमुठींमधे अभिमान फुंकून त्यांचं वज्रमुठींमधे परिवर्तन करण्याची अलौकिक शक्ती या कथांमध्ये आहे. या कथांचे स्फूर्तीस्थान असलेले शिवराय आणि त्यांचे गडकोट हे तर मराठी मनाचे मानबिंदूच. परंतू गेल्या काही वर्षात भटकंती करताना एक गोष्ट खटकली. ती म्हणजे, परवशतेतले तोफगोळे सुद्धा माशी झटकावी तसे झटकून टाकणारे हे मानी पुराणपुरुष स्वराज्यात मात्र स्वैराचाराच्या नंग्यानाचाने अपमानित होऊन माना टाकत आहेत. राजगड काय किंवा त्याच्या समोरचाच तोरणा काय, हे आणि असेच अनेक भले मातबर किल्ले अंगाखांद्यावर पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि खोके झाडाझुडपांआड लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. या समस्येचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करत असताना आमच्या असं लक्षात आलं की गडदुर्गांकडे बघण्याचा दृष्टीकोन हेच या सगळ्या समस्येचं मूळ आहे. किल्ला म्हणजे शहरातल्या गोंगाटापासून दूर जाऊन निवांत सायंसंध्या करण्याचं ठिकाण किंवा अंगातली रग आणि चित्रकलेची खुमखुमी जिरवण्याचं ठिकाण ठिकाण अशीच काहीतरी समजूत हे असले प्रकार करणाऱ्या नादान तरुणांनी करून घेतलेली आहेत. वास्तविक हे किल्ले म्हणजे आपली तीर्थ क्षेत्रे आहेत. इथलं पाणी तीर्थ समजून प्राशन करण्याऐवजी ते विषात मिसळून त्याचं पावित्र्य बिघडवणाऱ्या कृत्यांनी या स्थानांचा फार मोठा उपहास चालवलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्यावर अस्सल शिवभक्तांची मान आदराने तुकवली न जाता शरमेने झुकवली जाते आणि म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून ठाण्यातील आम्ही काही तरुण मित्र मंडळींनी ‘दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट’ या छोटेखानी दुर्ग व समाजसेवी संस्थेची स्थापना केली. इथे तरुण या शब्दाचा ‘मनाने तरुण’ असा अर्थ अभिप्रेत आहे. जनसामान्य आणि दुर्ग यांच्या भेटी होताना त्यांच्यातला पर्यटक लुप्त होऊन यात्रेकरू लुब्ध व्हावा म्हणून आम्ही प्रबोधनात्मक दुर्गभ्रमण सहली आयोजीत करतो. या सहलींदरम्यान सहभागींना पर्यावरण, इतिहास तसेच उपेक्षितांच्या अपेक्षांची जाणीव करून दिली जाते. गेली दोन वर्ष दुर्गसखा सातत्याने हे कार्यक्रम राबवत असून विविध किल्ल्यांवरून आत्तापर्यंत पंचेचाळीस ते पन्नास पोती कचरा गोळा करण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यात वृक्षारोपण, गडांवरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता हेही उपक्रम राबवण्यात येतात. परंतू हे करत असताना या गडदुर्गांच्या परिसरात राहणाऱ्या आदि निवासी बांधवांनाही मदतीची गरज आहे याची जाणीव झाल्याने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील विविध आदिवासी पाड्यांवरील शालेय विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ व्हावा म्हणूनही दुर्गसखाने प्रयत्न केले आहेत. यामधे विविध पाड्यांमध्ये, शाळेपर्यंतचा प्रवास सोपा होण्यासाठी सायकली, त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शैक्षणिक C.D आणि दूरदर्शन संच, संगणक साक्षरतेसाठी काही निवडक शाळांमध्ये संगणक, विद्यार्थी दत्तक योजना, अनेक विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप, दिवाळीत फराळ आणि फटाके यांचे वाटप, गावकऱ्यांच्या आग्रहाखातर ग्रंथालय, गरजूंना कपडे वाटप अशा अनेक समाजोपयोगी कामांचा समावेश आहे. अर्थात हे सारं शक्य झालं ते आपल्यासारख्या सुजाण नागरिकांच्या योगदानामुळेच. ही सारी कामे प्रत्येकजण आपापल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वयंप्रेरणेने करीत असतो. म्हणूनच आमच्या या स्वयंसेवी कार्यात आपणही यथाशक्य यथाशक्ती मदत करून हा जगन्नाथाचा रथ ओढण्यास मदत करावी अशी आम्ही आपणास विनंती करतो. आमच्या या छोट्याश्या कार्यात सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांनी पुढे दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा अथवा खाली नमूद केलेल्या ईमेल वर आपले नाव व संपर्क क्रमांक पाठवावा ज्यायोगे भविष्यातील कार्यक्रमांसाठी आपल्याशी संपर्क साधणे सोपे जाईल. आम्हाला विश्वास आहे, या कार्यात सहभागी होऊन आमच्यासोबत आपणही ‘एक पाऊल मानवतेकडे’ नक्कीच टाकाल.
आपले नम्र,
सर्व सदस्य
दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट