आपली आजची येणारी पिढी ही खर्या अर्थाने भारताच भविष्य आहे. आणि आज अनेक ग्रामीण व आदिवासी भागात अर्थकारणामुळे अनेकांना आपल शिक्षण अर्ध्यात थांबवावं लागत आहे. त्यातूनच अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही झाली की ते शिक्षण थांबवावं लागत आहे. त्याचसोबत आता दिवसेंदिवस शाळेचा खर्च अवाढव्य स्वरूप वाढत चालला आहे. वाढीव खर्चाचा बोजा गरजू – होतकरू विद्यार्थ्यांवरही पडत आहे. शिकण्याची आवड आहे, शाळेत हुशार आहे, पण घरची परिस्थिती कमकुवत असल्याने शिकता येत नाही. अशी बरीच उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. हा प्रकार कमी करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर आपण काय प्रयत्न करू शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपल्यावर प्रचंड ऋण असते. आपल्या जीवन जगण्यात समाजातील विविध क्षेत्रांतील अनेक माणसांचे योगदान झालेले असते. विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारे व्यक्ती जे कांही करीत असते, त्याचे बरे-वाईट परिणाम समाजावर होत असतात, तर त्याच्या उलट सामाजिक जीवनात ज्या बऱ्या-वाईट घटना घडतात त्याचे बरे-वाईट परिणाम व्यक्तींवर होत असतात.
अशाच काही मुद्द्यांवर लक्ष देत ठाण्यातील श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट गेली १४ वर्ष शहापूर याभागातील अनेक पाडे, वस्त्यावरील शाळांवर आणि तेथे शिकणाऱ्या मुलांसाठी काम करत आहे. यावर्षीही दिनांक १८ जून २०२३ रोजी शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्राथमिक रुपी कार्यक्रम शहापूर मधील किन्हवली जवळील शेलवली पाड्यातील शाळेत ठेवण्यात आला. यावेळी ५० हुन अधिक दात्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
भारतीय तत्वज्ञान अप्पा परचुरे यांचा लिखित एक लेख मी वर्तमान पत्रात वाचला होता, त्यातूनच प्रेरित होऊन मी सांगू इच्छितो की, माणसाचे मन नेहमी भुकेलेले असते. त्याला प्रेम हवे असते. सोबत हवी असते. विचारांचे खाद्य हवे असते. हे सर्व समाज पुरवीत असतो म्हणून माणूस हा समाजप्रिय प्राणी झाला. तो एकटा कधीच राहू शकणार नाही. आपण, आपले कुटुंबीय, आपले नातेवाईक, शेजारी, मित्र, व्यावहारिक संबंधांतून आपल्या संपर्कात येणारे इतरेजन, इत्यादींचे संघठन आणि त्यातून निर्माण झालेला विश्वाला म्हणजे समाज.
बघा ना…. आपल्या जन्मापूर्वीसुद्धा हा समाज होता; आणि आपल्या मरणानंतर हा समाज राहणार आहे. आपण व्यक्तिश: या समाजाचे एक घटक आहोत ही जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
जशी निसर्गातसुद्धा विविधता आहे. सर्व फुले,फळे, डोंगर, दऱ्या, खळखळून वाहणारे ओढे, तळे, नद्या एकाच रंगाची, आकाराची,आणि एकाच चवीची असती तर त्यात कुठला आनंद राहिला असता? नाही ना… कारण या निसर्गात विविधता आहे, तशीच समाजातसुद्धा ती असली पाहिजे. प्रत्येकाने आपले समाजसेवेचे कर्म ठरवून घ्यावे. वेळ मिळेल तसा यासाठी वेळ दयवा कारण… समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.
पुन्हा एकदा सर्व दानशूर व्यक्तींचे आम्ही मनापासून ऋणी आहोत. जसा आजवर आपण आमच्यावर विश्वास ठेवला, हा तसाच नेहमी आमच्या सोबत राहो, हीच मानापासूम इच्छा.
आपला नम्र
श्री दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे