महाराष्ट्र ही इतिहासाची जन्मभूमी. प्रभू रामचंद्रांपासून शिवप्रभूंपर्यंत अनेक शूरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी.त्यांच्या तेजस्वी दर्शनमात्रे बहरलेल्या अनेक कथा दंतकथा महाराष्ट्राचा कणा समजल्या जाणाऱ्या सह्याद्रीतच नव्हे तर या इथल्या मातीच्या कणाकणात भिनलेल्या आहेत. इथल्या बालकांच्या बाळमुठींमधे अभिमान फुंकून त्यांचं वज्रमुठींमधे परिवर्तन करण्याची अलौकिक शक्ती या कथांमध्ये आहे. या कथांचे स्फूर्तीस्थान असलेले शिवराय आणि त्यांचे गडकोट हे तर मराठी मनाचे मानबिंदूच. परंतू गेल्या काही वर्षात भटकंती करताना एक गोष्ट खटकली. ती म्हणजे, परवशतेतले तोफगोळे सुद्धा माशी झटकावी तसे झटकून टाकणारे हे मानी पुराणपुरुष स्वराज्यात मात्र स्वैराचाराच्या नंग्यानाचाने अपमानित होऊन माना टाकत आहेत. राजगड काय किंवा त्याच्या समोरचाच तोरणा काय, हे आणि असेच अनेक भले मातबर किल्ले अंगाखांद्यावर पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि खोके झाडाझुडपांआड लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. या समस्येचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करत असताना आमच्या असं लक्षात आलं की गडदुर्गांकडे बघण्याचा दृष्टीकोन हेच या सगळ्या समस्येचं मूळ आहे. किल्ला म्हणजे शहरातल्या गोंगाटापासून दूर जाऊन निवांत सायंसंध्या करण्याचं ठिकाण किंवा अंगातली रग आणि चित्रकलेची खुमखुमी जिरवण्याचं ठिकाण ठिकाण अशीच काहीतरी समजूत हे असले प्रकार करणाऱ्या नादान तरुणांनी करून घेतलेली आहेत. वास्तविक हे किल्ले म्हणजे आपली तीर्थ क्षेत्रे आहेत. इथलं पाणी तीर्थ समजून प्राशन करण्याऐवजी ते विषात मिसळून त्याचं पावित्र्य बिघडवणाऱ्या कृत्यांनी या स्थानांचा फार मोठा उपहास चालवलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्यावर अस्सल शिवभक्तांची मान आदराने तुकवली न जाता शरमेने झुकवली जाते आणि म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून ठाण्यातील आम्ही काही तरुण मित्र मंडळींनी ‘दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट’ या छोटेखानी दुर्ग व समाजसेवी संस्थेची स्थापना केली.